नागराज मंजुळे घेऊन येणार या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग; चाहत्यांची उत्सुकता वाढली

मनोरंजन

नागराज मंजुळे (Nagraj Manjule Upcoming Films) यांचा सिनेमा म्हटलं की काहीतरी वेगळ, काहीतरी कल्पनेपलीकडचं पाहायला मिळतं. नागराज सामान्य माणसांची कहाणी असामान्य पद्धतीने मांडतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मराठीमध्ये ‘सैराट’, ‘फँड्री’ असो किंवा हिंदीतील ‘झुंड’, नागराज यांच्या प्रत्येक सिनेमाला एक ‘क्रिएटिव्ह टच’ आहे.

   

नागराज यांनी लिहिलेला आणि मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलेला आणखी एक सिनेमा म्हणजे ‘नाळ’. या सिनेमाची कथा, संवाद, गाणी सर्वाचेच प्रेक्षकांनी कौतुक केले.या सिनेमात श्रीनिवास पोकळेने चिमुरडा चैत्या, देविका दफ्तारदार यांनी त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना या सर्वच भूमिका आवडल्या.

शेवट गोड झालेल्या या कथानकामध्ये पुढे काय होईल असा प्रश्न चाहत्यांना पडलाच असेल. आता याचं उत्तर स्वत: नागराज देणार आहेत.नागराज मंजुळे यांनी एक पोस्ट शेअर करत महत्त्वाची घोषणा केली आहे. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची अर्थात ‘नाळ २’ ची घोषणा त्यांनी केली आहे. स्वत: नागराज यांनाही हा प्रश्न पडला होता की नाळच्या दुसऱ्या भागामध्ये नेमकं काय असू शकतं.

हे वाचा:   मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याची चर्चा रंगतेय, पण वास्तव खूपच वेगळे आहे....

पण या सिनेमाचे दिग्दर्शक-लेखक सुधाकर रेड्डी यक्कंती यांनी नागराजना दुसऱ्या सिनेमाची कथा सांगून आश्चर्यचकित केले. नागराजने शेअर केलेल्या या लेटेस्ट फोटोमध्ये सुधाकर, नागराज, देविका आणि श्रीनिवास दिसत आहेत.

नागराज यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात? नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली.

स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या ‘नाळ’ प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे! ‘नाळ २’च्या नावानं चांगभलं!’

नागराज यांच्या पोस्टनुसार सिनेमाचं शूटिंग हल्लीच सुरू झालं असून प्रेक्षकांना नाळ २ चा अनुभव घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. मात्र नागराज यांनी केलेल्या घोषणेनंतर सिनेमा कधी प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत चाहते आहेत.

Leave a Reply