CID मालिकेतील अभिनेत्याच्या दुचाकीचा अपघात, शूटींगसाठी जात असताना घडली घटना

Uncategorized

सोनी एंटरटेनमेंट या वाहिनीवरील ‘बडे अच्छे लगते है २’ ही मालिका कायमच चर्चेत असते. या मालिकेतील सातत्याने येणाऱ्या ट्वीस्टमुळे ही मालिका चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या मालिकेतील कलाकाराबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मालिकेत आदित्य हे पात्र साकारणार अभिनेता अजय नागरथ याच्या दुचाकीचा अपघात झाला आहे. त्यामुळे तो जखमी झाल्याचे समोर येत आहे. अजय नगरथ याने ‘सीआयडी’ या मालिकेत पंकज या पोलिस अधिकाऱ्याचे पात्र साकारले होते. त्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

   

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अजय नागरथ याच्या गाडीचा अपघात होऊन काही दिवस उलटले आहेत. त्याच्या गाडीला अंधेरी परिसरात अपघात झाला. तो शूटींगसाठी जात असताना ही घटना घडली. त्याच्या मागून येणाऱ्या गाडीने त्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे त्या शरीरावर जखमांच्या खुणा पाहायला मिळत आहेत.

या अपघातानंतर ई-टाईम्सने त्याच्याशी संपर्क साधला असता तो म्हणाला, “माझा अपघात झाल्याचे वृत्त अगदी खरं आहे. यामुळे मी जरा हादरलो आहे. हा अपघात माझ्या चुकीमुळे घडला. मी उजव्या बाजूने गाडी चालवत होतो. मात्र गाडी चालवत असताना अचानक मला डावीकडे वळायचं आहे, असे आठवलं. त्यावेळी माझ्या पाठीमागून एक गाडी येत होती. तिने मला धडक दिली आणि मी पडलो.”

हे वाचा:   त्या' फोटोमुळे एका क्षणात संपलं मंदाकिनीचं करिअर; आता काय करते अभिनेत्री?

“मी शूटींगसाठी जात असताना मुंबईतील मॉडेल टाऊनजवळ (अंधेरी) या परिसरात हा अपघात झाला. यात पूर्णपणे माझी चूक आहे. त्यामुळे कोणीही कार चालकाला दोष देऊ नये. सुदैवाने मला कोणतेही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झालेले नाही. पण मला खूप ठिकाणी खरचटलं आहे, जखमाही झाल्या आहेत. तसेच यामुळे माझ्या शरीराला वेदना होत आहेत.”

पण मी देवाचे आभार मानतो की मी हेल्मेट घातले होते. त्यामुळे मी बचावलो. या अपघातात माझे हेल्मेटही खराब झाले आहे. मी एकता कपूरच्या शूटींगपासून जवळपास तासभर दूर होतो. अपघातानंतरही मी तिथे गेलो. त्यावेळी एकता मॅमने माझी चौकशी केली. त्या फार दयाळू आहेत. मी फक्त काही तास शूट करत होतो. त्यानंतर मला त्यांनी बरं होण्यासाठी वेळ दिला. अजय आता बाईक सोड, गाडी घे. तू चांगली कमाई करतोस त्यामुळे तुला गाडी घ्यायला काहीही हरकत नाही, असा सल्लाही त्यांनी मला दिला. पण शूटिंगच्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर खूप ट्रॅफिक असते, त्यामुळे मी बाईकने जातो, असे अजय नगरथने सांगितले.

दरम्यान अजय नगरथ हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. २०१२ मध्ये त्याने ‘सीआयडी’ या मालिकेत पंकज हे पात्र साकारले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली. सध्या तो ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेच्या दुसऱ्या भागात ‘आदित्य शेखावत’ ही भूमिका साकारत आहे.

Leave a Reply