सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrasekhar) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत दिवसागणिक वाढत होताना दिसत आहे. शनिवारी याप्रकरणी दिल्ली न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलिनवर अतिशय गंभीर आरोप केले. केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, अभिनेत्रीला देश सोडून पळून जायचे होते. पण LOCच्या (लाइन ऑफ कंट्रोल) समस्येमुळे तिला तसे करता आले नाही. तत्पूर्वी, सुनावणी पूर्ण करताना न्यायालयाने अभिनेत्रीला अंतरिम दिलासा दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबरला होणार आहे.
जॅकलिनवर काय केले आरोप?
दिल्ली कोर्टात जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर ईडीने आपला जबाब नोंदवला आणि जामीन देण्यास विरोध केला. त्याच्या उत्तरात ईडीने अनेक मोठे खुलासे केले. ईडीने सांगितले की, जॅकलीनने सुकेशकडून मिळालेल्या अनेक भेटवस्तू आणि पैशांचा उपभोग घेतला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्याचा लाभ मिळाला. तसेच जॅकलिनने तपासादरम्यान पुराव्यांशी छेडछाड केल्याचेही अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. तपासादरम्यान तिने मोबाईलमधील डेटा डिलीट करून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण LOC च्या नियमांमुळे तिचा तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. जॅकलीनने तपासात कधीच सहकार्य केले नाही, पुरावे दाखवून किंवा इतर आरोपींसमोर बसून चौकशी केली असता, तिने केवळ कबुली दिली.
जॅकलिनला जामीन देण्यास EDचा विरोध
तपासादरम्यान जॅकलिनची वागणूक चांगली नव्हती, ती पुरावे आणि साक्षीदारांना नुकसान पोहोचवण्याचा विचार करताना दिसली, असे ईडीने म्हटले आहे. या युक्तिवादांसह ईडीने पटियाला कोर्टात आपला जबाब नोंदवला असून जॅकलिनला जामीन देण्यास विरोध केला.