राजू श्रीवास्तव, सिद्धांत वीर सुर्यवंशी या सुप्रसिद्ध कलाकारांना वर्कआऊट करतानाच हृदय विकाराचा झटका आला. या सुप्रसिद्ध कलाकारांच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्रामधील मंडळी हादरली. दरम्यान त्यांच्या चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले.
पण यादरम्यान वर्कआऊट केल्यामुळे हृदय विकाराचा झटका येतो का? असा प्रश्न निर्माण झाला. अशामध्येच आता वर्कआऊटमुळे हृदयविकाराचा झटका येतो का? याबाबत शाहरुख खानचा मराठमोळा ट्रेनर प्रशांत सावंत याने भाष्य केलं आहे.
गेल्या २५ वर्षांपासून प्रशांत फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींना त्याने ट्रेन केलं आहे. सध्या तो शाहरुख व वरुण धवनला ट्रेन करत आहे. ‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार प्रशांतने वर्कआऊट दरम्यान हृदयविकाराचा झटका येणं याबाबत भाष्य केलं आहे.
प्रशांत म्हणाला, “व्यायामदरम्यान हृदयविकाराचा झटका येतो हे ऐकून लोकांच्या मनामध्ये फिटनेसबाबत भिती निर्माण झाली आहे. कोविडनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मी नियमित विविध लोकांना भेटतो. करोनानंतर लोकांच्या शरीरामध्ये तसेच रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बदल झाले आहेत. हे बदल बहुदा लोकांच्या लक्षात येत नसावे. काही लोकांच्या हृदयावर याचा परिणाम होत आहे.”
“व्यायाम हे हृदय विकाराच्या झटक्याचं कारण नसू शकतं. यासाठी तुमची जीवनशैली थोड्या फार प्रमाणात जबाबदार असते. नियमित चेकअप न करणं, कोलेस्ट्रॉलचं वाढतं प्रमाण, हृदयविकाराचा आजार अशी काही मुख्य कारणं हृदयविकाराच्या झटक्यासाठी कारणीभूत ठरतात. याचा व्यायामाशी संबंध नाही.
” गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आहे. पण व्यायाम करत असताना हृदय विकाराच्या झटक्यामुळे अभिनेत्याचं निधन झालं ही बातमी मी ऐकली नव्हती असं प्रशांत म्हणतो. करोनानंतर या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचं प्रशांतचं म्हणणं आहे.