गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगालमध्ये झारखंडमधील एका अभिनेत्रीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
रिया कुमारी उर्फ ईशा आलिया असे या अभिनेत्रीचे नाव आहे. या बातमीनं सध्या सर्वत्र गळबळ उडाली असून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
झारखंडमधील अभिनेत्री ईशा आलिया हिची बुधवारी पहाटे पश्चिम बंगालमधील हावडा येथे महामार्गावरील दरोडेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची बातमी हिंदुस्थान टाईम्सने दिली आहे.
ईशा आलिया आणि तिचा पती प्रकाश कुमार त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीसह रांचीहून कोलकाता येथे जात असताना ही घटना घडली. 22 वर्षीय ईशा आलियाची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनं सर्वांना मोठा धक्का बसला असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.
पोलिस या घटनेकडे संशयास्पद म्हणून पाहत आहेत. रियाचा पती प्रकाश याची चौकशी सुरू आहे. रिया कुमारी झारखंडमध्ये ईशा आलियाच्या नावाने खोरथा आणि प्रादेशिक भाषांच्या अल्बममध्ये काम करायची. या घटनेविषयी ईशा आलियाच्या पतीनं सांगितलं, ‘माझी मुलगी नुकतीच झोपेतून जागा झाली होती.
माझ्या पत्नीने मला कार पार्क करण्यास सांगितले जेणेकरून ती तिला खाऊ घालू शकेल. मी गाडी पार्क केली आणि निसर्ग पाहण्यासाठी बाहेर पडलो. तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि आमच्या मागे उभी राहिली. तीन जण खाली उतरले आणि एकाने माझ्यावर हल्ला केला. त्याने माझे पॉकेट घेतले आणि मला ढकलले. अचानक मला माझ्या बायकोचा ओरडण्याचा आवाज आला. मी आवाज देण्यापूर्वीच गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि ते लोक पळून गेले’.
दरम्यान, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा परिसर अगदी उजाड आहे, त्यामुळे प्रकाश कुमार मदत मागण्यासाठी सुमारे दोन किलोमीटर खाली गेले. या घटनेनंतर ईशा आलियाला उलुबेरिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.