रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या टीमने नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमध्येही हजेरी लावली होती.
हास्यजत्रेतील कलाकारांबरोबर ‘सर्कस’ चित्रपटातील कलाकारांनीही प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर व अश्विनी काळसेकर हे मराठी कलाकारही झळकले आहेत.
रोहितच्या अनेक चित्रपटांत मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतात. मराठी कलाकारांना चित्रपटात कास्ट करण्यामागचं खरं कारण रोहितने हास्यजत्रेत सांगितलं.
“तुझ्या चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस, असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. यामागे काहीतरी कारण आहे. मराठी कलाकार हे साधे व प्रतिभावान आहेत. ते अहंकारी नसतात. उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार आहेत.
पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेत काम करतात. याबरोबरच मला चित्रपटातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ६० टक्के वाटा हा महाराष्ट्रातून येतो”, असं म्हणत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचं कौतुक केलं.
रोहित शेट्टी व रणवीर सिंगसह ‘सर्कस’ चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिस, विजय पाटकर, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनीही प्रमोशनसाठी हास्यजत्रेत हजेरी लावली होती.