साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. सध्या ‘पुष्पा: द रूल’ या सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या भागात श्रीवल्लीची भूमिका साकारत रश्मिकाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
मात्र आता सीक्वेलमध्ये रश्मिकाची जागा दुसरी अभिनेत्री घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकंच नव्हे तर निर्मात्यांनी एका लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीला भूमिकेची ऑफर दिल्याचंही म्हटलं जात आहे. या चर्चांदरम्यान ‘पुष्पा 2’विषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
पुष्पा 2 मध्ये आणखी एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार असल्याची चर्चा असली तरी रश्मिकाची भूमिका तशीच राहणार आहे. निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या बहिणीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री साई पल्लवीला ऑफर दिल्याचं कळतंय. दिग्दर्शक सुकुमार हे अल्लू अर्जुनच्या बहिणीच्या भूमिकेत साई पल्ल्वीला पाहू इच्छितात. म्हणूनच त्यांनी तिला ऑफर दिली आहे.
एका साहसी आदिवासी मुलीची ही भूमिका आहे. चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत तिला 20 मिनिटांचा स्क्रीन टाइम दिला जाईल. मात्र ही भूमिका कथेसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. सईने जर ही भूमिका नाकारली तर निर्माते अभिनेत्री ऐश्वर्या राजेशला ती ऑफर देतील, असंही कळतंय.
पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता सीक्वेल आणखी रंजक करण्याच्या प्रयत्नात निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. त्यामुळे सीक्वेलमधील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी RRR स्टार रामचरणलाही विचारण्यात आल्याचं समजतंय. अल्लू अर्जुन आणि रामचरणने ‘रंगस्थलम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता.
12 डिसेंबरपासून पुष्पा 2 च्या शूटिंगला सुरुवात झाली. पुष्पा: द राईज या चित्रपटातही स्टार कॅमिओचा फंडा वापरण्यात आला होता. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला खुद्द अल्लू अर्जुनने विनंती केली होती. त्यानंतर तिने करिअरमधला पहिला आयटम साँग ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी केला होता. समंथा आणि अल्लू अर्जुनचं ‘ऊ अंटावा’ हे गाणं तुफान गाजलं होतं.