थंडीच्या दिवसांत गार पाणी नको वाटतं, त्यामुळे आपल्याकडून पाणी कमी प्यायलं जातं. पाणी कमी प्यायल्याने शरीरात कोरडेपणा वाढतो. इतकंच नाही तर याचा परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता किंवा अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात. तसंच या काळात अनेकांना सर्दी- कफ यांसारखेही त्रास होतात. अशावेळी घशाला आराम मिळावा आणि पचन चांगलं व्हावं म्हणून आपण कोमट पाणी पितो. अनेकदा थंडीच्या दिवसांत गारठा असल्याने सकाळी झोपेतून उठल्यावरही कोमट पाणी प्यायलं जातं. लहान मुलं किंवा वयस्कर व्यक्तींना पाणी बाधू नये म्हणून कोमट करुन पाजलं जातं.
कोमट पाण्याने घशाला आराम मिळतो आणि पचनक्रिया सुरळीत होते. तसंच पाणी कोमट केलं की ते पचायला हलकं होतं किंवा त्यातले जंतू मरुन ते शुद्ध होतं असे काही ना काही समज आपल्या मनात असतात. हे जरी खरं असलं तरी सरसकट सगळ्यांनी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधेमणी याविषयीच काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. गरम पाणी, कोमट पाणी आणि रुम टेंप्रेचरचे पाणी कोणी प्यावे याविषयी त्यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. आयुर्वेदात याविषयी विस्ताराने सांगितले आहे असे म्हणत डॉ. राधेमणी यांनी आपल्याला याविषयी माहिती दिली आहे. साधं पाणी कोणी प्यावं आणि कोमट पाणी कोणी प्यावं याविषयी त्या काही महत्वाच्या टिप्स शेअर करतात.
साधं पाणी कोणी आणि कधी प्यावं?
साधं पाणी म्हणजेच रुम टेंपरेचरचे पाणी म्हणजे काय याविषयीही डॉ. राधेमणी यांनी स्पष्ट केले आहे. तर साधे पाणी म्हणजे उकळून गार करुन ठेवलेले पाणी.
१. अल्कोहोलचे सेवन केल्यानंतर
२. खूप थकलेले असाल किंवा चक्कर आल्यासारखे होत असेल तर
३. खूप जास्त तहान लागली असे तर
४. उन्हात असताना
५. फूड पॉयझनिंग झाले असल्यास
६. रक्त वाहत असेल तर
तरच कोमट पाणी प्या…
१. भूक कमी असेल
२. जठराग्नी मंद असेल तर
३. घसादुखी किंवा घशात खवखव होत असल्यास
४. ताप, कफ आणि सर्दी असल्यास
५. कुठे वेदना किंवा दुखत असल्यास
६. पोटात वात होत असल्यास