आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात रविवारी 28 मे रोजी होणारा अंतिम सामना पावसामुळे सोमवारी राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. रविवारी प्रेक्षक आपल्या आवडत्या संघांमध्ये होणारी आयपीएलचा फायनल सामना पाहण्यासाठी मैदानावर गेले होते. परंतु पावसाने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले. परंतु यावेळी भर पावसात भिजणाऱ्या धोनी आणि हार्दिक पांड्याच्या फॅन्सना आधार देण्यासाठी अप्रत्यक्षपणे विराट कोहलीच धावून आला. सध्या यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ रविवारी मोदी स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा आहे. तब्बल 1 लाख प्रेक्षक संख्या असलेल्या स्टेडियममध्ये पाऊस पडत असल्याने सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक भिजण्यापासून वाचण्यासाठी आडोसा शोधत होते. परंतु स्टेडियम बाहेर सर्व ठिकाणी प्रेक्षकांची खचाखच गर्दी होती. यावेळी स्टेडियम बाहेर विविध ठिकाणी आयपीएल 2023 मधील स्टार खेळाडूंचे मोठे पोस्टर्स लावलेले होते.
pic.twitter.com/W2rEwWgAI1#ViratKohli saved The Day Yesterday from Rain at #NarendraModiStadium !!🌧️☔
— Krowkk. (@Krowkk_) May 29, 2023
पाऊस पडत असताना भिजण्यापासून वाचण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियमच्या परिसरात लावलेला विराट कोहलीच पोस्टर काढून डोक्यावर धरला. विराटच्या या पोस्टरमुळे धोनी आणि हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या फॅन्सचे पावसात भिजण्यापासून संरक्षण झाले. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट करून लिहिले, “बिचारा विराट कोणाकोणाला वाचवणार”, “जाऊदे आरसीबी अशी तरी फायनलच्या मैदानात आली”.