असं म्हणतात की परिस्थिती आपल्याकडून कधी काय करुन घेईल याचा कहीच नेमक नसतो. अगदी तसंच काहीसं ‘नियम व अटी लागू’ या नाटकातील कलाकारांसोबत घडलं. नाटकाचा प्रयोग आटोपल्यानंतर कलाकार संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत दामले आणि इतर मंडळी परतीच्या प्रवासाला लागले. पण, या वाटेत त्यांच्यापुढे एक आव्हान वाट पाहत उभंच होतं. ही वेळच अशी होती, की परिस्थिती हाताळण्यासाठी खुद्द संकर्षण पुढे आला आणि त्यानं चक्क बस चालवली.
आतापर्यंत चालकाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं प्रवाशांनी वाहनांचं स्टेअरिंग हातात घेतल्याचं तुम्हीआम्ही पाहिलं. पण, इथं तर चक्क अभिनेत्यानंच वाहनाचं सारथ्य करत सोबतच्या सर्वांना सुखरुप अपेक्षित स्थळी पोहोचवलं. सध्या त्या क्षणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उत्तम दर्जाचा अभिनय करणारे आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. साधारण 25 सेकंदांच्या या व्हिडीओची सुरुवात रात्रीच्या अंधारातील रस्त्यापासून होते. जिथं कोणा एका माहामार्गावरून ते प्रवास करत असल्याचं लक्षात येत आहे. पुढे व्हिडीओ पाहिला असता चक्क अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच बसचं स्टेअरिंग हाती घेत ती चालवताना दिसत आहे. प्रथमक्षणी हे खरंही वाटत नाही, पण दामले यांनी प्रसंगाबाबतची लिहिलेली माहिती वाचून संकर्षणचं कौतुकच करावसं वाटतं.
संकर्षणनं बस चालवण्याची वेळ नेमकी का आली, याबाबत प्रशांत दामले (Prashant Damle) लिहितात, ”काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबलं”
याच प्रसंगात इथं एंट्री झाली ती संकर्षणची. पुढे दामले लिहितात, ”पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन्स आहे हे कालच मला कळलं. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर….नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत.”