अक्षय कुमार हा आघाडीचा अभिनेता आहे. पण दिल्लीत जन्मलेला राजीव भाटिया अक्षय कुमार (Akshay Kumar) नावाने देशभरात कसा लोकप्रिय झाला? याची मूळ कथा त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटात दडलेली आहे. त्याने आपले नाव बदलून अक्षय कुमार का ठेवले, याबद्दल आजवर अनेक किस्से आपण ऐकले आहेत. आता त्याने स्वतः नाव बदलण्याचा निर्णय व त्यावर त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया याबद्दल खुलासा केला आहे.
महेश भट्ट दिग्दर्शित ‘आज’ चित्रपटाच्या सेटवर त्याचा पहिला दिवस कसा होता, असं अक्षय कुमारला ‘गॅलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं. या चित्रपटात राज बब्बर, स्मिता पाटील आणि कुमार गौरव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘आज’मध्ये अक्षय कुमारची खास भूमिका होती. “चित्रपटात कुमार गौरवचं नाव काय होतं, तुम्हाला माहित आहे का?
अक्षय. अशाच रितीने मला माझं नाव मिळाले. हे बऱ्याच लोकांना माहित नाही,” असं अक्षय म्हणाला. “माझं खरं नाव राजीव आहे आणि शूटिंगच्या वेळी मी सहज विचारलं की चित्रपटातील नायकाचं नाव काय आहे? त्यांनी अक्षय असं उत्तर दिलं. मग मी त्यांना सांगितलं की मला माझं नाव अक्षय ठेवायचं आहे.”
इंडस्ट्रीत आधीपासून राजीव कपूर असल्यामुळे अक्षयने त्याचं मूळ नाव बदललं का? असं विचारल्यावर तो म्हणाला, “राजीव हे एक चांगलं नाव आहे आणि मला वाटतं की तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान किंवा मंत्री होते. ते एक छान नाव होतं आणि मी ते असंच बदललं. कोणत्याही पंडितने मला माझं नाव बदलायला सांगितलं, असं काहीच घडलं नव्हतं. माझ्या वडिलांनीही मला विचारलं होतं की ‘तुला काय झालं, नाव का बदलतोय,’ त्यावर माझ्या पहिल्या चित्रपटातील हिरोचं नाव हे होतं, त्यामुळे मी तेच नाव ठेवणार,” असं सांगितलं.
अक्षय कुमार हा ९० च्या दशकापासून बॉलीवूडमध्ये सक्रिय असलेला एक आघाडीचा अभिनेता आहे. शाहरुख खान, आमिर खान व सलमान खान या तिघांप्रमाणेच त्यानेही सिनेसृष्टीवर राज्य केलं आणि आपल्या ॲक्शन चित्रपटांमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली.
इतके सुपरहिट चित्रपट देणारा अक्षय गेल्या काही काळापासून हिट चित्रपटांसाठी संघर्ष करत आहे. ‘ओएमजी २’, ‘सूर्यवंशी’ या दोन चित्रपटांशिवाय त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. आता नुकताच त्याचा ‘सरफिरा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी कमी ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसांत सहा कोटींच्या आसपास कमाई केली आहे.