बॉलिवूड अभिनेता संजय दत्त असा कलाकार आहे ज्याच्या अफेअरचे किस्से आजही ऐकिवात आहे. सध्या संजय दत्त त्याची पत्नी मान्यता दत्त आणि मुलांसह सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. पण एक काळ असाही होता ज्यावेळी संजयच्या लव्ह लाइफची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा झाली होती. संजय दत्तने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत. असंच काहीसं ‘खलनायक’ चित्रपटाच्या वेळीही झालं होतं. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी संजयच्या खासगी आयुष्यातही बराच गदारोळ सुरू होता.
संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा आजारी होती आणि तिच्यावर परदेशात उपचार सुरू होते. तर दुसरीकडे मुंबईतही परिस्थिती फार काही चांगली नव्हती. एकूण काय तर संजय सर्व बाजूंनी तणावग्रस्त होता. अशातच ‘खलनायक’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी संजय आणि माधुरी दीक्षित यांच्यात मैत्री झाली. पण ही मैत्री एवढी पुढे गेली की दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यावेळी मासिकांमध्ये संजय आणि माधुरी यांच्या कथित अफेअरबाबत रकानेच्या रकाने भरून लिहिलं जात असे. ज्याचा संजयच्या कुटुंबावर आणि वैवाहीक आयुष्यावर थेट परिणाम होत होता.
संजय आणि माधुरीच्या नात्याबद्दल असंही बोललं जात की, संजय दत्तबरोबर माधुरी दीक्षित एवढी खुश होती की प्रत्येक मुलाखतीत ती संजयचं कौतुक करत असे आणि तो आपला आवडता को-स्टार असल्याचंही सांगत असे. जेव्हा संजय दत्त आणि माधुरी यांच्या या कथित अफेअरबाबत पत्नी ऋचा शर्माला समजलं तेव्हा ती आपलं वैवाहीक आयुष्य वाचवण्यासाठी उपचार अर्ध्यातच सोडून मुंबईला परतली होती.
ऋचा शर्मा जेव्हा मुंबईला परतली तेव्हा संजयने तिला अजिबात महत्त्व दिलं नव्हतं. पत्नी एवढी आजारी असूनही तो पत्नी आणि मुलगी त्रिशालाला घेण्यासाठी एअरपोर्टला गेला नव्हता. या घटनेचा उल्लेख लेखक जर्नलिस्ट यासिर उस्मान यांनी त्याचं पुस्तक ‘संजय दत्त : द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड बॅड बॉय’मध्ये केला आहे. एवढंच नाही तर त्यावेळी संजय दत्त माधुरीशी लग्न करण्याच्या बेतात होता असंही बोललं जातं. यासिर उस्मान यांच्या पुस्तकात याचाही उल्लेख आहे की, जेव्हा ऋचाने संजयला थेट, “तू मला घटस्फोट देणार आहेस का?” असा प्रश्न केला तेव्हा मात्र त्याने याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता.
या सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय दत्तने ऋचा शर्माशी लग्न करण्यासाठी बरीच विनवणी केली होती. संजय दत्तने एका मुलाखतीत माधुरी दीक्षितशी कोणत्याही प्रकारची जवळीक असल्याचं वृत्त साफ नाकारलं होतं. ऋचाचं आजारपण वाढल्याने ती पुन्हा अमेरीकेला निघून गेली आणि त्याच वेळी संजय दत्तला तुरुंगवास झाला. त्यानंतर गोष्टी एवढी बिघडत गेल्या की ऋचाचं १० डिसेंबर १९९६ मध्ये निधन झालं.
दरम्यान ऋचा शर्माच्या निधनानंतर तिची बहीण एना शर्माने माधुरी दीक्षितवर बरेच गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही तर माधुरीने आपल्या बहिणीचा संसार मोडला असंही तिने म्हटलं होतं. एका मुलाखतीत माधुरीवर आरोप करताना एना म्हणाली होती, “माधुरी दीक्षित माणूस नाही तर एक दगडाच्या काळजाची बाई आहे. तिला दुसरा कोणाताही पुरुष मिळाला असता. पण ती अशा पुरुषाबरोबर कशी काय राहिली जो माझ्या बहिणीशी एवढा वाईट वागला होता.”