Hindustan ki Antim Dukan : भारत हा देश फक्त नावाने किंवा सीमेने बांधिल देश नाही. भारतात संस्कृती, पर्यटन, भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा, पारंपारिक चालिरिती, खाद्यसंस्कृती अशी विविध बहुअंगी रुपं विविध कानाकोपऱ्यात पहायला मिळतात. असंच एक भाग म्हणजे उत्तराखंडचा चमेली जिल्हा…
चमोली हा उत्तराखंड राज्यातील प्रसिद्ध जिल्हा आहे. हा जिल्हा चीनच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यातील एका गावात भारतातील शेवटचे दुकान जगभर फेमस (India’s last shop) आहे. चमोली जिल्ह्यातील माणा नावाच्या गावात भारतातील शेवटचे दुकान आहे. हा एक प्रसिद्ध सेल्फी पॉइंट देखील आहे.
तब्बल 25 वर्षांपूर्वी चंदर सिंह बारवाल नावाच्या व्यक्तीनं हे दुकान उघडलं होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी ही परंपरा सुरू ठेवली. उत्तराखंडमध्ये फिरायला येणारे लोक सर्वात आधी या गावात येतात अन् इथं सेल्फी घेण्यास विसरत नाहीत. दुकानात मिळणारा चहा म्हणजे…भन्नाटच…स्वर्गातील अमृत म्हणावं असा… येथे अतिशय चविष्ट मॅगी मिळते, याचा आस्वाद पर्यटन नक्की घेतात.
स्वर्गात जाण्याचा मार्ग…
असं मानलं जातं की, या दुकानानंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे. येथील लोक मानतात की, माणा गावाचा महाभारताशी विशेष संबंध आहे. या गावाचं जुनं नाव मणिभद्रपुरम होते. या ठिकाणाहून पांडव थेट स्वर्गात गेले, असा इतिहास गावकरी अभिमानाने सांगतात.
काय म्हणाले आनंद महिंद्रा-
आनंद महिंद्रा यांनी काहीदिवसांपूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या गावाचा फोटो शेअर केला होता. भारतातील सर्वोत्तम सेल्फी स्पॉट्सपैकी एक…हिंदुस्थान की अंतिम दुकान… तिथला एक कप चहा अनमोल आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं होतं.