मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नावही आवर्जून घेतलं जातं. मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरल्या. आता तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिची ‘अथांग’ ही वेबसीरिज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसीरिजनिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तेजस्विनीने एक धक्कादायक खुलासा केला.
सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये तेजस्विनीने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आलेल्या अनुभवांबाबत भाष्य केलं. यावेळी करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये एका नगरसेवकाने तिला थेट ऑफर केली असल्याचं तेजस्विनीने सांगितलं.
ती म्हणाली, “मी सिंहगड रोडला राहायचे. तेव्हा सिंहगड रोड येथील नगरसेवकाच्या एका घरी मी भाड्याने राहत होते. घर भाडं देण्यासाठी त्या नगरसेवकाच्या मी ऑफिसला गेले होते. तेव्हा मला असं कळालं की या लोकांचा आपल्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोनच वेगळा असतो. कारण एक आंबा नासका निघाला की बाकी सगळे नासके आहेत असं म्हटलं जातं. किंवा दुसरे आंबे नासके आहेत का? हे बघितलं जातं.”
“मी घरभाडं द्यायला गेले आणि त्या व्यक्तीने मला थेट ऑफर केली. २००९ व २०१०च्या दरम्यान ही घटना घडली. त्याने जेव्हा मला ऑफर केली त्याक्षणी माझ्या समोर फक्त एक पाण्याचा ग्लास होता. मी तेच ग्लासातलं पाणी त्या व्यक्तीच्या तोंडावर फेकलं. मी अशा गोष्टी करायला येथे आली नाही.
अन्यथा मी भाड्याने राहिले नसते. कलाक्षेत्रामध्ये मला अशाच पद्धतीने पैसे कमवायचे असते तर मी गाड्या, घर असं काय काय खरेदी केलं असतं. तुमची परिस्थिती तसेच तुम्ही कलाक्षेत्रात काम करत आहात हे पाहून तुम्हाला अशाप्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात.” अशा अनेक प्रसंगांनी खूप काही शिकवलं असंही तेजस्विनीने यावेळी सांगितलं.