पिळदार शरीर कमावणं हे काही सोपं काम नाही. बॉडी बिल्डर होण्यासाठी जीममध्ये तासंतास घाम गाळावा लागतो. योग्य आहार घ्यावा लागतो. अन् यासाठी काही लाख रुपये देखील खर्च होतात. तेव्हा कुठे तुमचं शरीर एखाद्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी तयार होतं. पण एक व्यक्ती असा आहे ज्यानं घरच्या घरीच एखाद्या आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डरला लाजवेल अशी शरीरयष्टी कमावली आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे हा व्यक्ती ५२ वर्षांचा आहे. तो दिवसभर रिक्षा चालवतो. मात्र त्याची शरीरयष्टी बघाल तर हादरूनच जाल. त्यानं घराच्या घरी कुठल्याही ट्रेनर शिवाय इतकी जबरदस्त बॉडी कमावली आहे.
केरळमध्ये राहणाऱ्या या बॉडी बिल्डरचं नाव राजा सेखरन असं आहे. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. पण तसं असलं तरी देखील तो नियमीत व्यायाम देखील करतो. वयाच्या ५२ व्या वर्षी देखील त्याच्याकडे कमालीचा फिटनेस आहे. एखाद्या तरुणाला लाजवेल अशी शरीरयष्टी त्याच्याकडे आहे.
तो आपल्या व्यायामाचे व्हिडीओ इंटरनेटवर देखील शेअर करतो. त्यानं आपल्या घरातच जुनं सामान गोळा करून एक लहानशी जीम तयार केली आहे. कुठल्याही ट्रेनरशिवाय या जीममध्ये व्यायाम करून त्यानं जबरदस्त बॉडी कमावली आहे.
इंटरनेटवरून शिकला व्यायाम
सोशल मीडियावर त्याला देशभरातील हजारो लोक फॉलो करतात. तो आपल्या व्यायामाचे आणि डाएट प्लानचे व्हिडीओ शेअर करतो. जीममध्ये व्यायाम करणं हे त्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हतं. त्यामुळे त्यानं इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून हळूहळू व्यायाम शिकला.
रिक्षावाल्याचा व्यायाम पाहून व्हाल थक्क
व काही गोष्टी त्यानं जीममध्ये जाणाऱ्या आपल्या मित्रांकडून शिकल्या. अन् आता तो स्वत:च इतरांना व्यायाम करण्याचं ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा देतो. जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे या रिक्षावाल्यानं सिद्ध करून दाखवलं.