कधी ‘गुत्थी’ तर कधी ‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ अशी पात्रं साकारून प्रेक्षकांना हसवणारा सुनील ग्रोवर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच काही ना काही मजेदार पोस्ट शेअर करत असतो. या पोस्टमधील व्हिडीओंमध्ये तो कधी दूध विकताना दिसतो. तर कधी शेंगदाणे विकताना.
पण आता नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो ‘वेलकम’मधील नाना पाटेकर यांच्यासारखा कांदे-बटाटे विकताना दिसत आहे. त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांच्या धम्माल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
सुनील ग्रोवरची लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट खूपच मजेदार आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर धम्माल कमेंट्स केल्या आहेत. ज्या वाचल्यानंतर हसूही आवरणार नाही. या फोटोवर कमेंट करताना अर्जुन बिजलानीने त्याच्या महगड्या पँटची खिल्ली उडवली आहे.
त्याने लिहिलं, “पँट तर Balenciaga Ga ची दिसत आहे. ती कितीला दिली भाई.” तर एका युजरने वेलकम चित्रपटाचा डायलॉग कमेंटमध्ये लिहिला आहे, “आलू ले लो, कांदा ले लो, सुबह से ना एक आलू बिका है ना ही आधा कांधा”
सुनील ग्रोवरच्या या फोटोवर कमेंट करताना एका युजरने कपिल शर्माचा उल्लेख केला आहे. युजरने कमेंटमध्ये लिहिलं, “कपिल शर्मा शो जॉइन कर मग तुला ही अशी कामं करावी लागणार नाहीत.” सुनील ग्रोवर काही वर्षापूर्वी कपिल शर्मा शोचा महत्त्वपूर्ण भाग होता.
मात्र कपिल आणि सुनील यांच्यात वाद झाल्यानंतर दोघांनीही एकत्र काम करणं बंद केलं. कपिलने अनेकदा जाहीररित्या सुनीलने शोमध्ये परत यावं यासाठी विनंती केली पण सुनीलने असं अजिबात केलं नाही.
कपिल शर्माच्या टीमपासून वेगळं झाल्यानंतर सुनील ग्रोव्हर अनेक शो आणि चित्रपटांमध्ये दिसला. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘गुडबाय’ चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच आगामी काळात शाहरुख खानच्या ‘जवान’मध्येही दिसणार असल्याचं बोललं जात आहे.