सिनेमात काम करण्यासाठी कलाकारांनी आपलं शिक्षण, नोकरी सोडल्याचं ऐकलं असेल, पण एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी सिनेमात काम करणं सोडलं. एकेकाळी महेश भट्ट, संजय दत्त, करीना कपूर आणि जॅकी श्रॉफसारख्या दिग्गजांसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने कलाविश्व सोडलं.
पापा कहते है’ फेम अभिनेत्री मयूरी कांगोने आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी बॉलिवूड सोडलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती गुगल इंडियामध्ये नोकरीला लागली आणि आता गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून काम करत आहे.
मयूरीने ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये करिअर सुरू केलं होतं. १९९५ मध्ये ‘नसीब’ सिनेमातून तिने डेब्यू केला होता. मयूरीला महेश भट्ट यांच्या ‘पापा कहते है’ सिनेमातून मोठी पसंती मिळाली. या सिनेमातील ‘घर से निकलते ही कुछ दूर चलते ही’ हे गाणं सुपरहिट ठरलं होतं.
तिने सैफ अली खान आणि करीना कपूरसह ‘कुर्बान’, संजय दत्त, शिल्पा शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ‘जंग’, बॉबी देओल आणि राणी मुखर्जीसह ‘बादल’ सिनेमातही काम केलं आहे. शेवटची ती २००१ मध्ये आलेल्या ‘जीतेंगे हम’ सिनेमात दिसली होती.
मयूरीने २००३ मध्ये आदित्य ढिल्लोसह लग्न केलं आणि अमेरिकेत स्थायिक झाली. न्यूयॉर्कमधून तिने एमबीए केलं. २००४ ते २०१२ पर्यंत ती अमेरिकेत होती. त्यानंतर २०१२ मध्ये ती भारतात आली. तिने भारतातच आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती गुगलमध्ये इंडस्ट्री हेड पदावर कार्यरत आहे.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीचं करिअर जवळपास १० वर्ष असतं. त्यामुळे त्यांच्याकडे बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. मी कधीही शिक्षण सोडलं नाही म्हणूनच करिअरच्या या टप्प्यावर असल्याचं ती म्हणते. बॉलिवूडमध्ये येताना आधी शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचं ती सांगते.