मुंबई: तुम्हाला शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील छोटी अंजली आठवतेय का? या छोट्या अंजलीने तिच्या क्युटनेसने सर्वांची मनं जिंकली होती. तीच अंजली आता मोठी झाली आहे आणि आयुष्यातील नव्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे.
अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईदने नुकताच साखरपुडा केला. सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिचा बॉयफ्रेंड गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करताना पहायला मिळतोय.
नवीन वर्षाचं निमित्त साधत बॉयफ्रेंडने सनाला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. सना गेल्या काही महिन्यांपासून साबा वॉनरला डेट करतेय. साबा हा हॉलिवूड साऊंड डिझायनर आहे. तो लॉस एंजिलिसमध्ये राहतो. सबाने याआधीही त्याच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
सनाच्या या व्हिडीओवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सना पहिल्यांदाच ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. या चित्रपटानंतर तिने ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’मध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.
2012 मध्ये सना ही करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सना सईद तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत होती. सना सध्या अभिनयविश्वापासून दूर आहे. मात्र ती अनेक टीव्ही शोज पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसते.
याशिवाय ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. ती तिचे खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत राहते, जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतात.