लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे पार पडणार आहे. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हळदी, मेहंदी आणि संगीत सोहळ्यानंतर त्यांचा विवाह धुमधडाक्यात पार पडणार आहे. त्यांच्या लग्नाच्या समारंभाचे फोटो समोर आले नसले तरी त्यांच्या लग्नानंतरच्या घराबद्दल काही माहिती समोर आली आहे. लग्नानंतर ते दोघेही वेगळ्या घरात राहणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस्टर आणि मिसेस मल्होत्रा लग्नानंतर जुहू येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या आलिशान घरात राहणार आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘सिद्धार्थ लग्नानंतर सुरुवातीला आपल्या बांद्रा येथील घरात राहील. मात्र ते तात्पुरतं असेल. तो जुहू येथे घर शोधत आहे. सिद्धार्थ त्याच्या लग्नाच्या गेल्या काही महिन्यांपासून जागेच्या शोधात होता.
अभिनेत्याला जुहू येथील एक बंगला आवडला आहे, जो ३ हजार ५०० चौरस फूट आहे आणि त्याची किंमत तब्बल ७० कोटी रुपये आहे. मात्र, सध्या सिद्धार्थ त्याच्याकडचे सर्व पर्याय स्कॅन केल्यानंतरच त्याच्या स्वप्नातील घराला होकार देणार आहे. त्याला पाली हिलच्या घरासारखं दुसरं घरही समुद्रासमोरचं हवं आहे. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ जुहू येथील घराला पसंती देण्याची शक्यता आहे.
मात्र सध्या लग्नानंतर कियारा तिच्या सासरी बांद्रा येथे जाणार असल्याचं बोललं जात आहे. काही वर्ष सिद्धार्थला डेट केल्यानंतर कियाराने त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेतला. ते राजस्थान येथील जैसलमेरमधील एका आलिशान राजवाड्यात लग्न करत आहेत. त्यांच्या लग्नात करण जौहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, आरती शेट्टी, ईशा अंबानी, अमृतापाल सिंह बिंद्रा यांनी हजेरी लावली आहे.