दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूने सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडपासून (Bollywood) राजकारण्यांपर्यंत सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली होती. सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता.
त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र त्याने असे का केले या प्रश्नांची उत्तरे सुशांतचे कुटुंब, मीडिया आणि त्याचे चाहते अद्यापही शोधत आहेत.
सुशांतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच भाष्य
सुशांतच्या मृत्यूचा त्याच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनाही मोठा धक्का बसला होता. ‘काई पो चे’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता अमित साध (Amit Sadh) यालाही त्याच्या निधनाने खूप दुःख झाले होते. अमित साधने चित्रपटसृष्टीही सोडण्याचा निर्णय घेतला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे अडीच वर्षांनी अमित साधने आपलं मन मोकळं केले आहे. सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने मी हादरलो होतो असेही अमितने सांगितले आहे.
समाजाचा दोष
अमित साधने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. “दीड वर्ष काई पो चे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांतसोबत माझी चांगली मैत्री झाली होती. सुशांत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळल्याची माहिती कळताच मी हादरून गेलो. मला सुशांतच्या मानसिकतेबद्दल माहिती होती. जर एखाद्याने आत्महत्या केली तर त्याचा अर्थ त्याच्या आयुष्यात अंधार आहे आणि अशा परिस्थितीत दोष त्या व्यक्तीचा नसून समाजाचा आहे, असे त्याचे म्हणणे होते,” असे साधने म्हटले आहे.
“यात सुशांतचा काहीही दोष नव्हता, पण त्याच्या आजूबाजूचे लोक दोषी आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती आशा गमावतो तेव्हा तो निष्काळजी होतो. त्या व्यक्तीच्या आजूबाजूचे लोक दोषी आहेत, कारण त्या व्यक्तीने त्यावेळी आशा गमावलेली असते. त्यावेळी त्याला कशाचीच पर्वा नसते,” असेही अमित साधने म्हटले.
चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न
“माझ्याही मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला होता. एवढेच नाही तर चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण आता सगळं ठिक आहे. पण एक वेळ अशी आली की मला फिल्म इंडस्ट्री सोडायची होती. त्यावेळी मी चिडलो होतो,” असे अमित साध म्हणाला.