कामानिमित्त किंवा फिरण्यानिमित्त अनेकांचं नवीन शहरात जाणं होतं. अशा वेळी राहण्यासाठी हॉटेलला प्राधान्य दिलं जातं. प्रवासानिमित्त सर्वोत्तम हॉटेलमध्ये राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हीही अनेकवेळा हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल. तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का?
कोणत्याही हॉटेलम फक्त पांढऱ्या रंगाचीच बेडशीट्स असतात. तसंच, फक्त पांढऱ्या रंगाचीच बेडशीट्स, उश्या, टॉवेल आणि नॅपकीन हॉटेलमध्ये का वापरतात, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? पांढरा रंग वापरण्यामागेदेखील कारण आहे. ‘आज तक’नं याबाबत माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
विचार केला, तर पांढऱ्या रंगाचे कपडे सहज खराब होतात. त्यावर लागलेले डाग सहज दिसतात. तरीदेखील हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीटचा वापर केला जातो. पांढऱ्या रंगाच्या याच गुणामुळे हॉटेल्समध्ये पांढऱ्या रंगाच्या बेडशीट्स असतात.
पांढर्या रंगावर कोणताही डाग सहज दिसू शकतो. म्हणूनच ग्राहकांच्या समाधानासाठी पांढऱ्या रंगाच्या बेडशीट्स घातली जातात. स्वच्छ पांढरं बेडशीट ग्राहकांना याची खात्री देतं, की ते स्वच्छ वातावरणात राहत आहेत. हॉटेलची खोली जितकी स्वच्छ दिसेल तितकी खोलीत राहणारी व्यक्ती अधिक आरामशीरपणे राहू शकते.
पांढरं बेडशीट वापरण्याचं आणखी एक कारण आहे. हॉटेलमध्ये साफसफाई करताना सर्व बेडशीट एकत्र धुतली जातात. अशा स्थितीत पांढऱ्या रंगाची सर्व बेडशीट्स सहज एकत्र धुता येतात. या उलट, हॉटेलच्या खोल्यांमध्ये रंगीबेरंगी बेडशीट्स घातली, तर धुण्याच्या वेळी त्यांचा रंग फिका होण्याची किंवा एकमेकांना लागण्याची भीती असते. यामुळे हॉटेलमधल्या बेडशीट्ससोबतच उशांचे अभ्रे आणि टॉवेल्सही पांढरे असतात.
एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार, पांढरा रंग सकारात्मकता आणि शांततेचं प्रतीक मानला जातो. यामुळेही हॉटेल रूममध्ये शांतपणे झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या बेडशीटचा वापर करणं उत्तम मानलं जातं. पांढरा रंग मनाला शांत आणि आनंदी ठेवतो.
हॉटेल्समध्ये पांढरी बेडशीट्स वापरण्याची सुरुवात 90च्या दशकानंतर झाली. त्यापूर्वी रंगीत बेडशीटचा वापर केला जात असे. 1990नंतर पाश्चिमात्य हॉटेल डिझायनर्सनी खोलीला लक्झरी लूक देण्यासाठी आणि ग्राहकांना आरामदायी अनुभव देण्यासाठी पांढरी बेडशीट्स वापरण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही संकल्पना जगभरात पसरली.