सब टिव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका सुप्रसिद्ध लेखक तारक मेहता यांच्या ‘दुनिया ने ओढा चष्मा’ या लेखांवर आधारित आहे. या मालिकेने टीआरपीचे बरेचसे विक्रम मोडले होते. सध्या ही मालिका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तारक मेहता हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली. त्याआधी भव्य गांधी, दिशा वकानी, नेहा मेहता अशा कलाकारांनी या लोकप्रिय मालिकेला निरोप दिला होता. याच सुमारास मालिकेशी संबंधित नवी माहिती समोर आली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालाल गडा हे मध्यवर्ती पात्र आहे. जेठालालच्या मुलाची, टप्पूची भूमिका अभिनेता भव्य गांधी साकारत होता. हे पात्र त्याची ओळख बनले होते. पण या मालिकेव्यतिरिक्त नाटक आणि सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याने २०१७ मध्ये त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले होते. निर्मात्यांनीही त्याची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राज अनादकतने हे पात्र साकारायला सुरुवात केली. सहा-सात आठवड्यांपूर्वी त्यानेदेखील मालिका सोडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राजच्या जाण्याने भव्य पुन्हा एकदा टप्पूच्या अवतारामध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भामध्ये निर्मात्यांनी त्याच्याशी संपर्क साधला होता. या संपूर्ण प्रकरणावर त्याने मौन सोडले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमध्ये परतण्याची माहिती खोटी असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे मालिकेचे चाहते पुन्हा निराश झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेसंबंधित अनेक अफवा पसरल्या आहेत. मागे दिशा वकानी यांना घश्याच्या कॅन्सर झाला असल्याची अफवा पसरली होती. त्यांचे भाऊ आणि दिलीप जोशी यांनी या गोष्टीचे खंडन केले होते.