‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकेमुळे अभिनेता राजीव खंडेलवाल नावारुपाला आला. राजीवचा आज ४७वा वाढदिवस आहे. आज राजीव त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. छोट्या पडद्याबरोबरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत त्याने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. राजीवचा चाहतावर्गही मोठा आहे.
कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. कास्टिंग काऊचलाही त्याला सामोरं जावं लागलं.२०१८मध्ये ‘मीटू’ चळवळीला सुरुवात झाली. या प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध व्यक्तींची नाव समोर येत असताना राजीवनेही त्यावेळी काही धक्कादायक खुलासे केले. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजीवला ‘मीटू’ चळवळीबाबत विचारण्यात आलं.
यावेळी आपल्याबरोबरही विचित्र प्रकार घडला असल्याचं राजीवने सांगितलं होतं.तो म्हणाला, “मी छोट्या पडद्यावर काम सुरु करण्यापूर्वीच एका दिग्दर्शकाने मला चित्रपटासाठी विचारलं. त्या दिग्दर्शकाने चित्रपट साईन करण्यासाठी मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं.
त्यानंतर मला त्याने त्याच्या रुममध्ये येण्यास सांगितलं. पण त्यासाठी मी त्याला नकार दिला. बाहेर माझी गर्लफ्रेंड वाट पाहत आहे असं मी त्यावेळी त्या दिग्दर्शकाला उत्तर दिलं. जेणेकरून मी स्पष्ट उत्तर देतो हे त्याला समजावं.”
पुढे तो म्हणाला, “पण त्यानंतर त्याने मला धमकी दिली की तू छोट्या पडद्यावर काम करणारा नवोदित कलाकार आहेस आणि मला नकार देतोस?” राजीवने त्यानंतर त्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्यास नकार दिला. पण माझ्या जागी एखादी मुलगी असती तर तिने काय केलं असतं हा विचारही त्यावेळी राजीवला सतावत होता.