समांथा रुथ प्रभूला झालाय गंभीर आजार, रुग्णालयातील फोटो शेअर करत म्हणाली…

Uncategorized

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली आहे. मागच्या काही महिन्यांपासून समांथा गंभीर आजाराशी झुंजत आहे. समांथाने तिच्या सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. समांथाची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत. चाहते ती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

   

समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे.”

समांथाने पुढे लिहिलं, “मला सुरुवातीला वाटलं होतं की हा आजार लवकरच बरा होईल आणि मी लवकर ठीक होईन, मला जास्त त्रासही होणार नाही. पण आता अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू जाणवतंय की, नेहमीच मी मजबूत आहे खंबीर आहे असं दाखवण्याची काहीच गरज नाही. ही गोष्ट स्वीकारणं एखाद्या संघर्षापेक्षा कमी नाही. डॉक्टरांना विश्वास आहे की मी लवकरच ठीक होईन. मी शारीरिक आणि मानसिकरित्या चांगल्या आणि वाईट दिवसांचा अनुभव घेत आहे. जेव्हा वाटतं की आता हे आणखी एक क्षणही सहन करू शकत नाही तेव्हा क्षण निघूनही जातो. याचा अर्थ असाच आहे की मी ठीक होण्याच्या जवळपास आहे. खूप सारं प्रेम…”

हे वाचा:   आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

मायोसायटिस म्हणजे स्नायूंमध्ये वेदना आणि सूज येणे. या आजारामुळे रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात आणि खूप वेदना होतात. या आजारामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि काहींच्या त्वचेवर पुरळ उठते. दरम्यान समांथाच्या कामाबद्दल बोलायचं तर ती ‘यशोदा’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. याआधी समंथाने ‘फॅमिली मॅन २’ आणि ‘पुष्पा’चं आयटम साँग ‘उं अंटवा’मध्ये काम केलं होतं.

Leave a Reply