तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये महत्वाचे पात्र साकारणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करून एका व्यक्तीने थेट सांगितले की, शिवाजी पार्क येथे दिलीप जोशी यांच्या घराबाहेर 25 जण हातामध्ये शस्त्रांसह घेऊन उभे आहेत. यानंतर नागपूर पोलिसांनी लगेचच मुंबई पोलिसांना त्याविषयीची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी या परिसरात पूर्ण तपासणी केली. हा फोन 1 फेब्रुवारी रोजी आलाय. दिलीप जोशी हे गेल्या कित्येक वर्षांपासून जेठालालचे पात्र तारक मेहता मालिकेमध्ये साकारत आहे. दिलीप जोशीची फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर जबरदस्त आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, शिवाजी पार्कमधील तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करणारे दिलीप जोशी यांच्या घराबाहेर बंदूक आणि शस्त्रे घेऊन 25 लोक उभे आहेत. पुढे तो व्यक्ती म्हणाला की, त्याने काही लोकांना बोलताना ऐकले की हे 25 लोक मुंबईत अशा प्रकारच्या कारवाया करण्यासाठी शहरात पोहोचले आहेत.
जेठालालच्या घरासमोर काही लोक शस्त्रे घेऊन उभे असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील तपास सुरू केलाय. गेल्या कित्येक वर्षांपासून जेठालालच्या पात्रातून दिलीप जोशी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील अनेक कलाकार मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.
चाहते जेठालाल आणि दयाबेनवर खूप जास्त प्रेम करतात. मात्र, काही दिवसांपासून दयाबेन मालिकेमध्ये दिसत नाहीये. दयाबेन मालिकेमध्ये कधी पुनरागमन करणार हा प्रश्न सातत्याने चाहते विचारताना दिसत आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित मोदी कायमच म्हणताना दिसतात की, दयाबेन लवकरच मालिकेमध्ये दिसणार आहे.
तारक मेहता अर्थात शैलेश लोढानेही मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये. यावर शैलेश लोढा याने काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटले होते की, पुस्तक प्रकाशित करणारे देशातील प्रकाशक हिऱ्याच्या अंगठ्या घालून फिरतात आणि लेखकाला स्वतःचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे.
दुसऱ्यांच्या कलागुणांवरून कमावणारे उद्योगपती जर स्वत:ला हुशार आणि मोठे समजू लागले तर मग कोणीतरी प्रतिभावान व्यक्तीने उभे राहून आवाज उठवावा लागतो आणि मी त्यापैकी आहे, ज्याने हा आवाज उठवला आहे. निर्माता कधीच कलाकारापेक्षा मोठा होऊन शकत नसल्याचे देखील शैलेश लोढाने म्हटले होते.