ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी म्हटलं. तसेच ८ महिन्यांपासून एकटेच राहत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. यानंतर सोशल मीडियावर याविषया अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावरच आता अभिनेत्री हेमांगी कवीने मत व्यक्त केलं. तसेच आपण कोण झालो आहोत? असा सवाल केला.
हेमांगी कवी तिच्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाली, “काल जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी गेल्याचं कळलं. अर्थात आधी सोशल मीडियावरून नंतर न्यूज चॅनलमधून. पण ते गेल्याची पेक्षा ते ‘कसे’ गेले याचीच ‘बातमी’ सर्वत्र जास्त पसरली. जाणाऱ्याला नीट जाऊ तरी द्या रे. बातमी देणाऱ्यांची आता ती पद्धतच झाली आहे. बातम्या अशाप्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याची. त्याशिवाय लोकं बातमीच बघत नाहीत असं त्यांना वाटतं. त्यांचा दोष नाही, शेवटी प्रत्येकाला पोट आहेच.”
“त्या बातमीवर आलेल्या कमेंट वाचून माणूसपणाची सिसारी आली. ते इतकं अंगावर आलं की, श्रध्दांजली वाहणं नकोसं झालं. त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही माहिती नसताना वाट्टेल ते बोलत सुटले लोक. त्यांच्या मुलाबद्द्ल, पत्नीबद्दल. असं मरण अनेक लोकांना येत असावं, पण केवळ ते अभिनेते होते, प्रसिद्ध होते म्हणून आपण वाट्टेल ते बोलण्याचा परवाना घेतला,” असं मत हेमांगी कवीने व्यक्त केलं.
हेमांगी कवी पुढे म्हणाली, “ज्या अभिनेत्याला आपण लहानपणापासून पहात आलोय त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं मला खुप स्वप्नवत वाटतं. ‘रंगीबेरंगी’ सिनेमात तुमच्यासोबत तुमच्या मुलीचं काम करण्याचं भाग्य मला लाभलं. रवींद्रजी जिथं कुठं आहात तिथं शांत असाल आणि आम्हाला माफ कराल अशी मी आशा करते.”
“गश्मीर महाजनी आधीच इतका संघर्ष करून उभा आहे, त्यात आता याची भर पडली. यासाठी खूप वाईट वाटत आहे. त्याला याचा सामना करण्याचं बळ मिळो. हो, सोशल मीडियावर किंवा कुठेही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण जरा तार्तम्य ठेवलं तर नाही का चालणार? बातमी देणाऱ्यांना चेहरा नाही पण आपल्याला आहे. हे थोडं लक्षात ठेऊया. बास,” असंही हेमांगीने नमूद केलं.