सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा बहुप्रतिक्षीत व दमदार स्टारकास्ट असलेला चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची अधिक चर्चा सुरु होती. चित्रपटाच्या अॅडवान्स तिकीट बुकींगलाही प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने पहिल्या दिवशी जास्त कमाई केली नव्हती, पण वीकेंडला चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. आता लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सलमानखानने यासाठी एक डीलही पक्की केली आहे. यासाठी सलमानने करोडो रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ची निर्मिती सलमान खानच्या सलमान खान फिल्म्सने केली आहे. चित्रपटाचे डिजिटल अधिकार zee5 ला विकले गेले आहेत. म्हणजेच थिएटरमध्ये करोडोंची कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. लॉकडाउन सलमान खानचा मागील चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ थेट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाला होता. ओटीटी वर हा चित्रपट ४.२ दशलक्ष वेळा पाहिला गेला. ओटीटीवर राधे चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर आता सलमानने आपला किसी का भाई किसी की जान चित्रपटही zee5 ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सलमानने मानले चाहत्यांचे आभार
फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १३ कोटींची कमाई केली होती. सलमान खानच्या चित्रपटासाठी ही चांगली ओपनिंग मानली जात नव्हती. पण २२ एप्रिलला ईदची सुट्टी असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती आणि परिणामी चित्रपटाच्या कलेक्शनमध्येही वाढ झाली. सलमान खाननेही पोस्ट करून चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले होते.
View this post on Instagram
सलमान खान फिल्म्सने ‘किसी का भाई किसी की जान’ च्या ओटीटी रिलीजसाठी Zee5 बरोबर ८० कोटी रुपयांचा करार केला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ‘किसी का भाई किसी की जान’चे ओटीटी हक्क ८० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सौदा मानण्यात येत आहे. मात्र. याबाबत सलमान खान फिल्म्सच्या बाजूने किंवा ZEE5 च्या बाजूनेही कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. चित्रपटाचे बजेट जवळपास १५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच ८० कोटींचे ओटीटी अधिकार आणि तीन दिवसांत ६२.२५ कोटींची कमाई असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत १४२.५५ कोटींची कमाई केली आहे.