फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. शाहरुख खानपासून ते विद्या बालनपर्यंत हे सेलिब्रिटी एकेकाळी छोट्या पडद्यावर दिसले होते. या यादीत टीव्हीच्या ‘बुलबुल’चाही समावेश आहे. ही अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. मृणाल 1 ऑगस्ट रोजी आपला 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे. महाराष्ट्रातील धुळ्यात जन्मलेली मृणाल बॉलिवूडमध्ये कशी पोहचली जाणून घ्या.
मृणालने ‘कुंडली भाग्य’ या सुपरहिट मालिकेत बुलबुल अरोरा ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही मुख्य भूमिका नाही तर साईड रोल होता. एकेकाळी छोट्या पडद्यापासून सुरुवात केलेल्या मृणालने आज केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतही आपलं नाव कमावलं आहे.
मृणाल ठाकूरला कारकिर्दीत अनेक नकारांचा सामना करावा लागला. तिला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला होता आणि याचा खुलासा खुद्द मृणालने एका मुलाखतीत केला होता. एक वेळ अशी आली की मृणाल आत्महत्येचा विचार करू लागली होती. पण आज मृणाल चित्रपटसृष्टीत स्टार आहे.
मृणाल ठाकूर महाराष्ट्रातील धुळे येथे झाला. पण तिचं शिक्षण मुंबईत पूर्ण झालं. मृणालने युगांतर आणि अर्जुन सारख्या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 2018 मध्ये मृणालला ‘लव्ह सोनिया’ चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक झालं होतं.
2019 मध्ये ती हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ चित्रपटात झळकली आणि तिचं नशीब चमकलं. यानंतर मृणालला एकापाठोपाठ अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मृणालने आजवर ‘सीता रामम’, ‘हाय नाना’, ‘द फॅमिली स्टार’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे.