मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांतून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवूनही अद्याप प्राजक्ताचा एकही चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने यामागचे कारण सांगितले आहे.
प्राजक्ता म्हणाली, “माझ्याकडे काम नाही, अशी वेळ नशिबानं अजूनपर्यंत आलेली नाही. मी आजपर्यंत जितकं काम केलं आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त नाकारलं आहे. मला कधीच कामाची कमतरता नाही जाणवली. परंतु, चित्रपटांच्या बाबतीत मला अजून हवं तसं काम मिळालेलं नाही. म्हणूनच कदाचित माझा कोणताच चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही. मी मालिका, नृत्य यांमध्ये बराच वेळ घालवला का? मी कोणत्याही ग्रुपचा भाग नाही. मला खोटं वागता येत नाही. माझ्या चेहऱ्यावर सगळं काही दिसतं किंवा मी ॲव्हरेज अभिनेत्री असेन, अशी बरीच कारणं असू शकतात.”
पुढे प्राजक्ता म्हणाली, “काम मिळतं; पण जसं काम हवं तसं मिळवण्यासाठी सतत धडपड सुरू असते. एकदा एक काम मिळालं की, त्याचं आकर्षण कमी होतं आणि नवीन कामाची ओढ लागते. त्यामुळे महत्त्वाकांक्षा व समाधान यांचा समतोल साधता येणं महत्त्वाचं आहे.”
प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे. लवकरच तिचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे, असे बरेच कलाकार झळकणार आहे. प्राजक्ताचा हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.